हवेलीत बफर झोन मध्ये सात ग्रामपंचायती सील

पुणे, हडपसर : २५ एप्रिल २०२० : कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रोज वाढत आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवेली तालुक्यातील आणखी सात ग्रामपंचायतीचा परिसर आज पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी एका पत्राद्वारे असा आदेश काढला आहे.
साथरोग प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार व हवेलीच्या तहसिलदारांच्या अहवालानुसार, हवेलीतील कोंढवे धावडे, न्यू कोपरे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव, सोरतापवाडी, या ग्रामपंचायतीचा परिसर, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आज सील केला आहे.
येथील संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. ही गावे केंद्र बिंदू मानून तीन किलोमीटरचा परिसर, बफर झोन प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. या परिसरात गोर-गरीब लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना संचारबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाणाऱ्या प्रत्येकानी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक-जावक, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तरीही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीही काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये म्हणून लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जे कोणी काम नसताना घराबाहेर पडतील अशा लोकांसाठी एक सेल्फी पॉईंटही प्रत्येक वॉर्डमध्ये उभा करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतील आणि कडक कारवाई सुद्धा केली जाईल, असे ग्रामपंचायत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी सांगितले आहे. मदत करताना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर यांसह अन्य सुरक्षेची काळजी स्वतः घ्यावी, असे बारवकर यांनी ‘न्यूज अनकट’शी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट, प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा