कोल्हापूर, ८ ऑगस्ट २०२० : कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात पावसानं काहीशी उसंत घेतली. मात्र गेले चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, भोगावती नदीपात्रात ७ हजार १०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडून ४४ फुटांवरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणक्षेत्रात संतधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सतत होत असलेली वाढ आणि पूरसदृश्य स्थिती लक्षात घेऊन, २३ गावांमधल्या साडेसातशे कुटुंबातल्या ४ हजार ४१३ व्यक्ती आणि अकराशे जनावरांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. जिल्ह्यातले अनेक रस्तेही पाण्याखाली गेले असल्यानं कोल्हापूर ते आजरा, कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गांसह जिल्ह्यातल्या ३७ मार्गांवरची वाहतूक बंद झाली आहे.
सांगली जिल्ह्यात वारणा धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला, तर सांगली जवळ कृष्णा नदीतली पाणी पातळी तेवीस फुटावर स्थिर आहे.
सातारा जिल्ह्यातही आता पावसाचा जोर ओसरला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या कोयना धरणात आज दुपारी १२ वाजेपर्यंत धरण क्षमतेच्या ६६ टक्क्याहून जास्त, ६९ पूर्णांक ६३ अब्ज घनफूट इतका पाणीसाठा झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी १९ पूर्णांक २८ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी