देवदर्शनावरुन परतताना काळाचा घाला, स्वतःच्याच बसखाली चिरडून सात महिला ठार

बंगळूर, ११ सप्टेंबर २०२३ : देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या सात महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या, त्याच मिनी बस खाली चिरडून यातील सात महिला ठार झाल्या. हा अपघात बंगळूर-चैन्नई महामार्गावर आज पहाटे पाच वाजता झाला आहे.

तामिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडपी आणि मैसूरच्या सहलीवर दोन मिनी बसमधून गेल्या होत्या. धर्मस्थळला दर्शन घेतल्यानंतर या महिला तमिळनाडूला परत निघाल्या होत्या. येताना वाटेत आज पहाटे एक मिनी बस नादुरुस्त झाली. ही बस रस्त्याकडेला थांबवून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालक करत होता. बस मधील महिला समोरच्या बाजूला रस्त्यावर बसल्या होत्या.

दरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रकने देवदर्शनासाठी आलेल्या मिनी बसला मागून धडक दिली. त्या धडकेने मिनीबस पुढे गेल्याने बस खाली सापडून सात महिला चिरडल्या गेल्या आणि जागीच ठार झाल्या, तर दहा महिला जखमी झाल्या आहेत. सर्व महिला तमिळनाडूच्या ओननगुटी या गावातील आहेत. दोन दिवसांपूर्वी त्या कर्नाटकात आल्या होत्या. हा अपघात बंगळूर-चैन्नई महामार्गावर थीरुपतूर जिल्ह्यात झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा