अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई, २४ एप्रिल २०२१: अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील ११ हजार ५८ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी श्री.मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक आणि ६ हजार १५९ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले.

दरम्यान ११ हजार ५८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासूनचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडविल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा