रेडिमेडच्या जमान्यातही शिलाई मशीनचा वेग सुसाट महिलांसाठी आर्थिक सक्षमतेचे माध्यम!

Even in the Era of Readymades, Sewing Machines Empower Women Financially

Even in the Era of Readymades, Sewing Machines Empower Women Financially: आजच्या रेडिमेड कपड्यांच्या युगातही शिलाई मशीनचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट ते महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. ग्रामीण भागातून शहराकडे आलेल्या अनेक महिला तसेच गृहिणी शिलाई मशीनच्या माध्यमातून घरखर्चाला हातभार लावत आहेत आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत.

सध्याच्या काळातही अनेक गृहिणी आपल्या शिवणकलेच्या कौशल्याने उत्कृष्ट ड्रेस शिवून कुटुंबासाठी अर्थार्जन करत आहेत. त्याचबरोबर, अनेक जण तर टेलरिंगचा व्यवसायही यशस्वीपणे चालवत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, फाइव्ह जीच्या आधुनिक जमान्यातही शिलाई मशीनचे महत्त्व कायम आहे.

विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घरगुती शिलाई मशीनची मागणी चांगलीच वाढली आहे. महिन्याला दीडशे ते दोनशे मशीनची विक्री होत असल्याचे विक्रेते सांगतात. हाताने किंवा पायाने चालणाऱ्या जुन्या मशीन आजही घराघरात वापरल्या जात आहेत, कारण त्यांची किंमत कमी असते आणि वीज बिलातही वाढ होत नाही, असे निगडी येथील टेलर विनोद सिंग यांनी नमूद केले. ते म्हणतात, “कापड शिवून कपडे घालणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे.”

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासन स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. समाज कल्याण विभागामार्फत शहरात शिलाई मशीन आणि पिको-फॉल मशीनचे वाटप करण्यात येते, ज्यामुळे महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक शिलाई मशीनचा वापर होत असला तरी, घरगुती वापरासाठी पारंपरिक मशीनला आजही पसंती दिली जात आहे, हे एक विशेष वैशिष्ट्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे