नवी दिल्ली : आज काल सोशल मीडिया आणि त्यावरील आभासी मैत्रीचे दुष्परिणाम हे चित्र आता काही नवीन राहिलेलं नाही. अशा आभासी मैत्रीचे परिणाम जीवघेणेही असू शकतात, असं आवाहन केलं जात असूनही तरुणाई या मैत्रीला बळी पडते. अशाच एका डेटिंग अॅप्लिकेशनवर झालेली ओळख एका तरुणीच्या जिवावर बेतली आहे.
याबाबत एक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझिलँडमधील ऑकलंड इथे अशी विचित्र घटना घडली आहे. एका २७ वर्षीय तरुणावर त्याच्याच मैत्रिणीची गळा घोटून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
त्याने डेटिंग अॅप्लिकेशनवर भेटलेल्या तरुणीला घरी बोलवून तिची हत्या केल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. पण, पोलिसांसमोर जी कबुली या तरुणाने दिली ती मात्र चक्रावणारी आहे.
तरुणाने दिलेल्या कबुलीनुसार, एका डेटिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणाची आणि मृत तरुणीची ओळख झाली होती. दोघांमध्ये काही दिवस चॅटिंगही चाललं होतं. मग त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं आणि दोघेही एका बारमध्ये भेटले. तिथे थोडावेळ घालवल्यानंतर ते दोघे त्याच्या घरी गेले. तिथे त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. या संबंधांवेळी तिने त्याला तिचा गळा दाबायला सांगितलं. त्यानेही तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचा गळा दाबला. मात्र, काही वेळाने त्याला ती तरुणी मृत झाल्याचं आढळलं.
तरुणीचा मृत्यू झाल्याने तो घाबरला आणि त्याने एका सूटकेसमध्ये तिचा मृतदेह लपवला. ती बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तरुणाचा मेसेज दिसला. त्यावरून पोलिसांनी त्याला गाठलं आणि त्याने ही धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.