शबरीमला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर मारला मिरची स्प्रे

केरळ: केरळातील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेश अधिकारासाठी आंदोलन करणाऱ्या बिंदू अम्मिनी यांच्यावर मंगळवारी (दि.२६)रोजी एका व्यक्तीने मिरची स्प्रे मारला. बिंदू यांना उपचारासाठी एर्नाकुलम रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस कार्यालयानजीकच अम्मिनी यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराला पोलिसांनी पकडले असून त्याचे नाव श्रीनाथ पद्मनाभन असे असून तो कन्नुरचा रहिवाशी आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला बिंदू अम्मिनी यांनी एका महिलेसोबत शबरीमला मंदिरात प्रवेश करून भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेतले होते. गेले काही दिवस शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जात असताना प्रवेशाचा लढा उभारणाऱ्या बिंदू अम्मिनी यांच्यावर एकाने मिरची स्प्रे मारला.

पोलीस आयुक्तालयानजीक बिंदू या कारमधून उतरताच हल्लेखोराने त्यांच्यावर स्प्रे मारला. त्यांनी जोरदार प्रतिकार करताच हल्लेखोराने पलायन केले. मात्र, काही वेळाने पोलिसांनी आरोपी श्रीनाथ पद्मनाभन याला ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्यासोबतच्या महिलांच्या भेटीसाठी बिंदू जात होत्या. देसाई आणि त्यांच्यासोबतच्या महिला कोची शहरात सकाळी पोहोचल्या होत्या. त्यांच्यासोबत बिंदू या शबरीमला मंदिरात प्रवेश करणार होत्या.

दर्शनासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती.
बिंदू अम्मिनी यांनी केरळ सरकारकडे शबरीमला मंदिरात प्रवेश करून अय्यप्पा दर्शन करण्यासाठी परवानगी मागितली होती. शबरीमला मंदिर दर्शन हा आमचा अधिकार आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे सरकारने आता लेखी स्वरूपात द्यावे, तेव्हाच आम्ही परत जाऊ, अशी भूमिका बिंदू यांनी घेतली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा