शहादा-मुंबई एसटी बसला राहुड घाटात आग; चालकाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

पुणे, १९ जानेवारी २०२३ : शहादा येथून मुंबईला जाणाऱ्या बसला उमराणे (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील राहुड घाटात अचानक आग लागल्याची घटना बुधवारी (ता.१८) घडली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले. यावेळी बसचालकाने सतर्कता दाखवीत बस महामार्गाच्या कडेला उभी करीत बसमधील ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत बसचा पुढचा भाग जळून खाक झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहादा येथून मुंबईला जाणारी एसटी महामंडळाची बस (एमएच- २०, बीएल- ४१२८) आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उमराणाजवळील पाच किमीवर मुबंई-आग्रा रोडवर राहुड घाट चढताना पहिल्या वळणावर चालक सचिन जगताप यांच्या सीटखाली धूर असल्याचे शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी चालकास सूचित केले. त्यानंतर जगताप यांनी त्वरित बस रस्त्याच्या कडेला थांबवीत तत्काळ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी वाहक रवींद्र नागरे यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. तर बसचा पुढील भाग पेटल्याने तत्काळ सोमा कंपनी व मालेगाव नगरपालिका अग्निशमनची वाहने घटनास्थळी दाखल झाली; परंतु तोपर्यंत बसचा पुढील भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने चालकाने समयसूचकता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बसला आग लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत असून, बसला आग का लागत आहे? याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा