गोल पोस्ट गोल पोस्ट संपादकीय विद्येची देवताही शरमली!

विद्येची देवताही शरमली!

Shahpur incident School
विद्येची देवताही शरमली!

न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे

जगाने २१ व्या शतकात प्रवेश केला असताना अजूनही मध्ययुगीन संस्कृती, परंपरा आपल्या मनात ठासून भरल्या आहेत. ज्या वयात मुलींना शरीरधर्म समजावून सांगायचा, त्या वयातील मुलींना भर वर्गात विवस्त्र व्हायला लावणे यासारखी दुसरी शरमेची बाब नाही. महिला मुख्याध्यापक असलेल्या शाळेत, तेही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हा संतापजनक प्रकार घडावा, यासारखी दुर्दैवी बाब नाही.

महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा वारसा असला, तरी आपली बुरसटलेली विचारसरणी अजून जायला तयार नाही. मासिक पाळीला अजूनही अपवित्र समजले जाते; परंतु मासिक पाळी असली, तरच अपत्य जन्माला येतात, याचा विसर पडतो. मासिक पाळीच्या काळात घरात यायचे नाही, चार दिवस दूर राहायचे, असा प्रघात अजूनही आहे. खरेतर पालक आणि मुलांतील संवाद कमी व्हायला लागला आहे, ही चिंतेची बाब असून त्यामुळे मुलांना शरीरातील होणारे बदल कुणाला सांगावेत आणि त्यातून काय धडा घ्यावा हे समजत नाही. ‘टीनएजर्स’ मुला-मुलींना शरीरातील बदल समजावून सांगितले पाहिजेत. त्यांचे त्याबाबतचे गैरसमज दूर केले पाहिजेत. मासिक पाळी आली, तर काय काळजी घ्यायची, हे मुलींना सांगितले पाहिजे. आता अलिकडच्या काळात त्याबाबत जागृती वाढली आहे, हे मान्य केले, तरी काही बुरसटेल्या लोकांची मानसिकता दूर करण्याचे मोठे आव्हान समाजापुढे आहे. आता अनेक शाळा, महाविद्यालयात याबाबत प्रबोधन केले जाते.

असे असले, तरी अजूनही मासिक पाळीबाबत जाहीरपणे बोलणे टाळले जाते. त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जाते. दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कृष्णा चांदगुडे यांनी स्वतःच्या मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिचा उत्सव साजरा केला. एकीकडे अशी पावले उचलली जात आहे. चांदगुडे यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात गेल्या दोन वर्षांपासून अनेक महिला आणि स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि प्रागतिक विचाराचे लोक सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये हा उत्सव होत असताना त्याच नाशिकपासून साठ-सत्तर किलोमीटरवर असलेल्या शहापूर येथील एका शाळेतील महिला मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांचे वर्तन विद्येच्या देवतेलाही खाली मान घालायला लावणारे आहे. आता या मुख्याध्यापक महिलेला अटक झाली असली, तरी असे प्रकार या ना त्या काळाने देशभर अनेक ठिकाणी घडले असून, त्यावर कठोर कारवाई आणि दुसरीकडे प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला जात नसल्याने मुलींची अवहेलना थांबत नाही.

शहापूर तालुक्यातील एका ट्रस्टच्या शाळेत घडलेल्या घटनेने शिक्षणाच्या मंदिराची प्रतिष्ठाच कलंकित केली नाही, तर मानवता आणि नैतिकतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी जेईई, नीट परीक्षेच्या वेळी मुलींनी काही लपवले आहे का, या संशयातून मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आली होती, तर इंदूर येथील एका शाळेत मोबाईल चोरीच्या आरोपावरून मुलींचे कपडे उतरवण्यात आले होते. आणखी काही शाळांत वेगवेगळ्या कारणांवरून मुलींना कपडे उतरवण्यास भाग पाडले. हे सर्व प्रकार मुलींच्या मनावर आघात करणारे आहेत. शहापूरच्या घटनेने तर अनेकांची मान शरमेने खाली गेली.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, त्यात शहापूरच्या घटनेची दखल घेतली गेली आणि संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कारवाईचे पाऊल उचलले, हे चांगले झाले, तरी महिला असूनही त्या असे कसे वागू शकतात, हा खरा प्रश्न आहे.

शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उचललेली पावले ही शोकांतिकेपेक्षा कमी नव्हती. पाचवी ते दहावीच्या निष्पाप विद्यार्थिनींचा हा केवळ अपमानच झाला नाही, तर त्यांच्या गोपनीयतेचेही घोर उल्लंघन करण्यात आले. या प्रकरणात, शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका परिचारिका यांना अटक करण्यात आली आहे, तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर, मुख्याध्यापकांनी संवेदनशीलता दाखवायला हवी होती. चौकशी करून ज्या मुलीला मासिक पाळी अचानक आली असेल, तिला सॅनिटरी पॅड देऊन, तिला जास्त त्रास होत असेल, तर घरी पाठवायला हवे होते. पालकांना बोलवून त्यांनाही समजून सांगायला हवे होते. तसेच बाथरूममध्ये रक्त नेमके कशामुळे पडले, याचा तपास करून मगच मुलींची चौकशी करायला हवी होती.

चौकशी करताना ही त्यांच्या मनावर आघात होणार नाही आणि त्यात आपुलकीची भावना असेल, असे महिला मुख्याध्यापक आणि त्यांच्या शिक्षकांना करता आले असते. शिकलेल्या आणि न शिकलेल्यांच्या वागण्यात काही फरक असतो; परंतु या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक मध्ययुगीन काळातील मानसिकतेप्रमाणे वागले. कोणतीही चौकशी न करता घाईघाईने असा निष्कर्ष काढला, की हे एका विद्यार्थिनीच्या मासिक पाळीमुळे झाले असावे. त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय होते. पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या सभागृहात बोलावण्यात आले. तेथे प्रोजेक्टरवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतलेले बाथरूमच्या जमिनीवर पडलेले रक्ताच्या डागांचे फोटो दाखवण्यात आले. स्वच्छता करणे हे शाळेच्या कर्मचाऱ्याचे काम असताना त्यांनाही हा आगाऊपणा करण्याचे काहीच कारण नव्हते.

शहापूरच्या शाळेतील प्रकार अतिशय संतापजनक होता. सभागृहात बोलवण्यात आलेल्या मुलींना ‘मासिक पाळी कोणाला येत आहे?’ अशी विचारणा करण्यात आली. हा प्रकारच भीतीदायक आणि लाजिरवाणा होता. त्यानंतरही काही मुलींनी धाडस केले आणि हात वर केले. त्यांची नावे, अंगठ्याचे ठसे आणि इतर माहिती नोंदवण्यात आली; पण हे इथेच थांबले नाही. मासिक पाळी येत नसल्याचे सांगणाऱ्या विद्यार्थिनींना एक एक करून बाथरूममध्ये नेण्यात आले. तिथे एका सेविकेने मुलींना त्यांचे कपडे काढायला लावले आणि त्यांची तपासणी केली. या दरम्यान, एका विद्यार्थिनीच्या अंडरवेअरमध्ये सॅनिटरी नॅपकिन आढळले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसमोर तिला फटकारले आणि अपमानित केले. या घटनेची माहिती
पालकांपर्यंत पोहोचताच त्यांचा संताप उफाळून आला.

शेकडो पालकांनी शाळेच्या आवारात जमून शाळा प्रशासनाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. त्यांनी या अमानुष कृत्यासाठी जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पालकांची ही भूमिका योग्यच होती. या प्रकरणावरून मोठा गहजब झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्याध्यापक आणि एका परिचारिकेला अटक केली. याशिवाय, चार शिक्षक आणि दोन विश्वस्तांवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यासाठी जागरूकता आणि संवेदनशीलता आवश्यक आहे; परंतु या शाळेने केवळ विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले नाही, तर त्यांच्यावर मानसिक आणि भावनिक आघात केला.

या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी घेणाऱ्या शाळांसारख्या शैक्षणिक संस्था अशा अमानवी कृत्यांचे अड्डे बनल्या आहेत का? लैंगिक छळ आणि शोषणापासून मुलांना वाचवण्यासाठी बनवलेला ‘पोक्सो’ कायदा या प्रकरणात किती प्रभावी ठरेल? आणि सर्वात मोठा प्रश्न, अशा घटनांमुळे समाजात मासिक पाळीशी संबंधित कलंक आणि अज्ञान आणखी वाढणार नाही का? या घटनेने पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेची आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित केली आहे.

शाळांमध्ये मासिक पाळी जागरूकता कार्यक्रम, शिक्षकांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण आणि मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कठोर धोरणे राबवणे आवश्यक आहे. तसेच, पालक आणि समाजाला अशा घटनांविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवावा लागेल. ही घटना केवळ ठाण्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी ही एक इशारा आहे. मुलींच्या प्रतिष्ठेचे रक्षण आणि शिक्षणाच्या मंदिरात मुलांची गोपनीयता असायला हवी. या प्रकरणात कठोर कारवाई आणि जागरूकताच भविष्यात अशा लज्जास्पद घटना रोखू शकते.

error: Content is protected !!
Exit mobile version