पुणे : शनिवारवाड्याचा आतला भाग केव्हाही पडू शकतो. त्यामुळे या संपूर्ण भागाची लवकरात लवकर डागडुजी झाली पाहिजे. दुसऱ्या कामाला जसं शासन तात्काळ निधी उपलब्ध करून देतं. तसंच सरकारने शनिवारवाड्याच्या डागडुजीकरिता देखील तातडीने निधी द्यावा. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या खुर्चीत बसलेत ती पेशव्यांची आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याचा २८८ वा वर्धापनदिन आहे. याचनिमित्ताने शनिवारवाड्यावर थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
जर शनिवारवाड्याची डागडुजी आणि सुशोभीकरण झालं तर पर्यटक मोठ्या संख्येने शनिवारवाडा पाहायला येतील.
आपला इतिहास त्यांना समजण्यास मदत होईल, असंही उदयसिंह यावेळी म्हणाले.
दरम्यान, शनिवारवाड्याचा वर्धापनदिन साजरा करण्यास मोठ्या संख्येने लोक जमले आहेत हे पाहून आनंद होतोय. मात्र शनिवारवाडा आणि पेशव्यांना मराठी माणूस विसरला आहे, अशी खंत उदयसिंह यांनी यावेळी बोलून दाखवली.