Sharad Mohol Revenge Plot Foiled by Pune Police: गुंड शरद मोहोळच्या क्रूर हत्येनंतर पुणे शहर हादरले असताना, आता या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मुठा कॉलनी, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवघेणी काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी संभाव्य मोठ्या संघर्षाला वेळीच आवर घातला आहे.
५ जानेवारी २०२४ रोजी सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून शरद मोहोळचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार हे सोमवारी सुतारदरा परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत ओंकार मोरेबद्दल माहिती मिळाली. मोरेकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने सापळा रचून मोरेला जेरबंद केले. त्याच्या झडतीमध्ये पिस्तूल आणि काडतुसे मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यातही मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेले शरद शिवाजी मालपोटे (वय २९) आणि संदेश लहू कडू (वय २४, दोघे रा. कोथरूड) यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या खुनानंतर सूडाचे सत्र सुरू होण्याची शक्यता वाढली होती, ज्याला पुणे पोलिसांनी आतापर्यंत दोनदा पायबंद घातला आहे.
दरम्यान, शरद मोहोळचा खून वर्चस्व वादातून गणेश मारणे टोळीने केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह १६ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे














































