अजित पवार गटाच्या ४० आमदारांना अपात्र करा, शरद पवार गटाची याचिका

4

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करा, अशी कडक भूमिका घेत शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाने ३० जून रोजी केंद्रीय आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. आपण पक्षाचे प्रमुख असून, पक्षाचे चिन्ह व नाव मिळावे, अशी मागणी त्यात केली आहे.

९ सप्टेंबरपर्यंत त्यावर उत्तर सादर करण्याची मुदत आयोगाने दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच शरद पवार गटाने आपले उत्तर कळविले. अजित पवार गटाने केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळून लावले आहेत. उलट त्यांच्या चाळीस आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांवरच कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. यामागे दबावाची खेळी होती.

शरद पवार यांना वाटत होते की, आमदार परत फिरतील, परंतु एकही आमदार परत आलेला नाही. तशी चिन्हेही दिसत नसल्यामुळे आणि अजित पवार यांनी पक्षांवरच दावा सांगितल्यामुळे आता हा पक्ष आपलाच असल्याचे स्पष्ट करण्यासाठी शरद पवार यांनी ४० आमदारांना पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची नवीन मागणी केली असल्याचे समजते. त्यावर अजित पवार गटाकडून कोणती भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा