मुंबई,३० जून २०२३ : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला होता.त्यावर शरद पवार यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, अशी टीका केली. शरद पवार यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे झाले.पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर ऐनवेळी माघार घेत आमच्यासोबत डबलगेम केला, असं फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असे पहिल्यांदाच जाहिर केले.
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे, शेवटी शरद पवार यांना सत्य सांगावे लागले. मला असे वाटते मी जी गुगली टाकली त्यात त्यांचे अर्धे सत्य बाहेर आले आहे. अजून उरलेले सत्य मी बाहेर काढेन. शरद पवार यांच्या गुगलीने माझी विकेट पडण्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवार यांचीच विकेट पडली. असे फडणवीस म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर