नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष अद्यापही चर्चेतच अडकले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे जाऊ नये, यासाठी भाजपचे दिल्लीतील नेतृत्व सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या गोटातून हे वृत्त दिले जात आहे. आज दिल्लीत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. भाजप सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत.
तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्यूला मांडला असून त्यानुसार, जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आले असल्याचे समजते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त सत्ता स्थापण्याचा प्रयत्न असताना, भाजपचे नेतेही सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातले आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे आधीच शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन होणे कठीण असून, भाजपशी जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नसेल, असाही सूर भाजपमध्ये आहे. त्यादृष्टीने डावपेच आखले जात आहेत.अशी माहिती समोर येत आहे.