नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ : बाबरी पडली तेव्हा नरसिंह राव सरकारमध्ये संरक्षण मंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपवर विश्वास ठेवू नका, बाबरी मशिदीला काहीच होणार नाही असा सल्ला मी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना बाबरी पडण्यापूर्वी दिला होता. असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. आम्ही नरसिंह राव यांना सल्ला दिला. पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला, असे शरद पवार म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या हाऊ प्राईमिनिस्टर्स डिसाईड या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी हे विधान केले. तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृह सचिव माधव गोडबोले यांच्यासोबत मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नाही, असे आश्वासन नरसिंह राव यांना दिले होते, असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.
काहीही होऊ शकते असे गृहमंत्री आणि गृह सचिवांना वाटत होते. पण नरसिंह राव यांनी सिंधिया यांच्यावर विश्वास ठेवला असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी त्यावेळीचा घटनाक्रमही सांगितला. मंत्र्यांचा एक गट होता, त्या गटाचा मीही सदस्य होतो. त्या मिटिंगमध्ये विजयाराजे सिंधिया यांनी बाबरीला काही होणार नाही, असे सांगितले होते. आम्ही सर्वेतोपरी काळजी घेऊ. पण पंतप्रधानांनी कठोर पावले उचलू नये,असे सिंधिया म्हणाल्या होत्या, असेही शरद पवार यांनी सांगितले.
विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकते असे आम्ही सांगितले होते. पण पंतप्रधानांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यानंतर काय झाले हे तुमच्यासमोर आहे, असेही पवार म्हणाले.
यावेळी नीरजा चौधरी यांनी बाबरी विध्वंसानंतर नरसिंह राव यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील दिला. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशि थरूर, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर