पक्ष फुटीनंतर शरद पवार यांची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा, छगन भुजबळांवर काय बोलणार याकडे लक्ष

8

मुंबई, ८ जुलै २०२३ : राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी केवळ बंडच केले नाही तर त्यांनी पक्षाचे चिन्हं आणि पक्षावरही दावा केला आहे. अजित पवार यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडेही केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे सर्व विश्वासू नेते अजित पवार यांना जाऊन मिळाले आहे. पक्षात पडझड झाल्यानंतर आता पक्ष सावरण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत. गेल्या आठवड्यात पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आज राज्यात पहिली जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

नव्यानेच मंत्री झालेले छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी चार वाजता येवला येथे ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकच्या येवला येथून होत आहे. तसेच ते यापुढे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या आजच्या दौऱ्यात खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पवारांसोबत आहेत. आजच्या सभेत निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आजच्या सभेतून अजित पवार यांच्यावर टीका करतात, की छगन भुजबळ याना निशाण्यावर ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेतून शरद पवार काही गौप्यस्फोट करतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांचे पुढचे दोन दौरे अनिश्चित आहेत. धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होणार आहे, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे. आजची येवल्यातील सभा पार पडल्यानंतर पुढील दौऱ्याची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे सुध्दा आज नाशिकला येत आहेत.त्यांच्याकडूनही येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांच्या स्वागताची जैयत तयारी करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा