पुणे, ५ सप्टेंबर २०२१: गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यावर राजू शेट्टी यांनी देखील मला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, शरद पवारांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी शब्द दिला होता. असं देखील माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे.
आता या नंतर शरद पवार यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांना राजू शेट्टींच्या नावाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या विषयावरील आपले मौन सोडले. शरद पवार म्हणाले, “राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे