पुणे २२ ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते, खासदार पद्मविभूषण शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात येणार आहे. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभानिमित्त उद्या शुक्रवारी (दि. २३ ऑगस्ट) दुपारी ४.३० वाजता धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे प्रांगण, इंद्रप्रस्थनगर, धायरी पुणे येथे हा ग्रंथतुला, तसेच स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजिला आहे,” अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण यांनी दिली.
काकासाहेब चव्हाण म्हणाले, “या सोहळ्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर,आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अरुण लाड, यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
“महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राच्या जडणघडणीत पवार साहेबांनी बहुमूल्य योगदान दिलेले आहे. जवळपास सहा दशके लोकनेता म्हणून पवार साहेब कार्यरत आहेत. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने गेल्या २५ वर्षांत सर्वांगीण विकासाचे शिक्षण, मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. शिक्षण, शैक्षणिक संस्थांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या पवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रंथतुला सोहळा अतिशय महत्वाचा आहे,” असेही काकासाहेब चव्हाण नमूद केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील