शरद पवारांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई ३१ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून पत्र काढून याबाबत माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

२ नोव्हेंबरला पवार यांना डिस्चार्ज मिळेल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये, असे आवाहन देखील पत्रकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

तसेच, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे ३ नोव्हेंबर शिर्डीतील सभेला हजर राहतील. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबीरालाही शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

चार आणि पाच रोजी आयोजित शिबिरात ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ यावर चर्चा होणार आहे. तसेच कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. त्या नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा