गोल पोस्ट महाराष्ट्र शरद पवार यांना कलेची जाण..: प्रिया बेर्डे

शरद पवार यांना कलेची जाण..: प्रिया बेर्डे

मुंबई, दि. ७ जुलै २०२०: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला अनुसरून आज प्रिया बेर्डे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत. प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी मध्येच का प्रवेश करणार आहेत याबाबत त्यांनी आज खुलासा केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे”.

याबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, “मला कलाकारांविषयी नेहमीच कळकळ वाटत आली आहे आणि कलाकारांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आधीपासूनच आहे. माझी इच्छा आहे की कलाकार तंत्रज्ञानासाठी काहीतरी काम केले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करण्यासाठी जर मला राष्ट्रवादीचे सहाय्य मिळणार असेल तर निश्चितच मला हे काम करायला आवडेल. राष्ट्रवादीसोबत हे काम करत असताना मी स्वतःला कधीही नेता म्हणून समजणार नाही तर एक कलाकार म्हणूनच काम करेल आणि या कार्यामध्ये केवळ मीच नाही तर माया जाधव व इतर सहकारी देखील असणार आहेत.”

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करताय अशी चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “असा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version