शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

2

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२०: महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा हवाला देत मंदिरे सुरु करण्याची विनंती केली होती. भगतसिंह कोश्यारी यांच्या या पत्राचा उल्लेख करत शरद पवार यांनी राज्यपालांना एक चांगलेच खरमरीत पत्र लिहिलं आहे. तसेच राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवलं आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना हे पत्र लिहिलं आहे.

शरद पवार यांना पाठवण्यात आलेल्या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच शरद पवार यांनी राज्यपालांना टोला दिला आहे. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”. अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं आहे.

“पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत”. तसंच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,” अशी आठवण करुन देत शरद पवारांनी टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबाबत पवार नाराज

‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे