शरद पवार यांना जशास तसे उत्तर?आता अजितदादा गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

बीड, १८ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल बीडमध्ये प्रचंड मोठी सभा झाली. या सभेतून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बीडमधील कोणताही मोठा नेता सोबत नसताना शरद पवार यांची प्रचंड सभा झाली. त्यामुळे मुंडे यांचे धाबे दणाणले आहेत. पवार यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे शरद पवार यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि पवारांच्या सभेच्या चौपट मोठी सभा घेण्यासाठी अजितदादा गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अजितदादा गटाची ही उत्तर सभा असेल असेही सांगितले जात आहे. त्याबाबतचे सुतोवाच धनंजय मुंडे समर्थक नेत्याने केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अभूतपूर्व सभा पार पडल्यानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक बळीराम गवते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभेत बोलताना शरद पवार यांनी विकासात्मक मांडणी केली नाही. शरद पवार यांची सभा ही तालुकास्तरीय होती. अजित पवार यांनी वेळ दिल्यास आम्हीही २७ तारखेला उत्तर सभा घेणार आहोत. त्यावेळी या सभेपेक्षा चार पटीने कार्यर्त्यांची गर्दी आमच्या सभेला होईल, असा दावा बळीराम गवते यांनी केला आहे.

परळी येथील बबन गित्ते यांचा प्रवेश आमच्यासाठी पर्याय नाही. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. परळीतील नव्हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनता मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे बबन गित्ते यांच्या प्रवेशाने धनंजय मुंडे यांना काहीही फरक पडणार नाही, असे बळीराम गवते यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा