मुंबई, २१ जून २०२१: नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली होती. या दरम्यान सुमारे अर्धा तास चर्चाही झाली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की, भाजप सोबत युती नसली तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध तसेच आहेत. या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील दिल्ली ला गेले आहेत. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार आता दिल्लीत गेले आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण उठलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचं सांगितलं जात आहे. भाजप कडून देखील अनेकदा आघाडी सरकारमध्ये फूट पडल्याचा दावा केला गेलता. त्यात नुकताच काँग्रेसने देखील स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आघाडी सरकार मध्ये सर्व अलबेल दिसत असलं तरी अंतर्गत मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच काल शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. अशावेळी पवारांचा दिल्ली दौऱ्याकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह भाजपचंही लक्ष लागलं आहे.
पवार आपल्या दिल्लीवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतकंच नाही तर सध्यस्थितीत पवारांची दिल्लीवारी म्हणजे राजकारणात नक्कीच काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.
शरद पवार, प्रशांत किशोर भेट
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानंतर शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. या बैठकीत देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याबाबत चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तर शिवसेनेकडून या भेटीचं स्वागत करण्यात आलं होतं. देशात एककल्ली कारभार सुरु आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे