शासनाकडे शेतकर्‍यांच्या विशेष आर्थिक पॅकेजचे अनुदान थकीत: मुंदडा

बीड, दि.२९मे २०२० : कोरोनाच्या संकटकाळात शेतकर्‍यांना विशेष आर्थिक पॅकेज देऊन राज्य शासनाकडून भरघोस मदत होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप शेतकर्‍यांना मदत झालेली नाही. मदत तर सोडाच उलट शासनाकडे विविध अनुदानाचे कोट्यावधी रुपये थकीत आहेत.
ते किमान पेरणीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले तर शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळू शकतो. शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी केजच्या आमदार नमिता मुंदडा यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

आ. मुंदडा यांनी केज मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विविध अनुदानाची थकीत रक्कम मिळावी, यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी देखील संवाद साधला आहे.

परंतु अद्याप शेतकर्‍यांच्या अनुदानाची रक्कम मिळेल अशी चिन्हे दिसून येत नाहीत. याबाबत शेतकरी संघटना, पक्ष देखील चिडीचूप आहेत. लॉकडाऊन असले तरी शेतकर्‍यांना आता शासनाकडे थकीत कोट्यावधींचे अनुदान मिळवून देण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले नाही, तर पुन्हा शेतकर्‍यांना सावकराच्या दाराची उंबरठे झिजवावी लागणार हे मात्र नक्की.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा