हैदराबाद: येथे एका व्यक्तीने आपल्या शेजारच्यांच्या कुत्र्यावर पॅलेट गनने गोळी मारून त्याची हत्या केली. एका खासगी बँकेत मॅनेजर असणारा हा व्यक्ती गेले काही दिवस या कुत्र्यावर नाराज असल्यामुळे त्याने ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रविवार (दि.२३) रोजी हैदराबादच्या सरुरनगरच्या बाबूनगर परिसरात घडली. याप्रकरणी आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव अविनाश करण (वय ३८ ) असल्याचं समजतं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ४२९ , कलम ३६६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाशवर(पीसीएए) कलम ११ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रविवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या समोर कुत्र्याची हत्या केली. आरोपीविरुद्ध राजू यादव या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली. जो या कुत्र्याची नेहमी देखभाल करायचा.
आरोपी अविनाश याने कुत्र्याला गोळी मारल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि काही लहान मुलांनी याबाबतची माहिती तात्काळ राजूला दिली. जेव्हा राजू घटनास्थळी आला तोपर्यंत या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी अविनाश याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना समजलं की, त्याने पॅलेट गनने कुत्र्याची हत्या केली.
सरुरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांच्या हवाल्याने अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, ‘अविनाश हा कुत्र्यावर गेले काही दिवसांपासून नाराज होता. तो जेव्हाही आपल्या घराचा गेट उघडायचा तेव्हा-तेव्हा हा कुत्रा घराच्या बाहेरील परिसरात घुसायचा. या गोष्टीला आरोपी प्रचंड वैतागला होता. आरोपीने याबाबत पोलिसांनी असा जबाब दिली आहे की, ‘फक्त कुत्र्याला घाबरविण्यासाठी मी गोळी चालवली होती. पण मला माहित नव्हतं की, कुत्र्याला एवढ्या घातक पद्धतीने जखम होईल आणि तो मारला जाईल.’