शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी, 70 हजार हेक्टरी भरपाई; मनोज जरांगे यांच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत. बीडच्या नारायणगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील आजारी असूनही उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जोरदार आवाज उठवला आणि शासनावर दबाव टाकण्याची तयारी दर्शवली.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मनोज जरांगे यांच्या 8 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  1. ओला दुष्काळ जाहीर करणे.
  2. 70 हजार रुपये हेक्टरी भरपाई देणे.
  3. नदीकाठीची शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपये मदत करणे.
  4. संपूर्ण कर्जमुक्ती.
  5. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबाला शासकीय नोकरी देण्याची मागणी
  6. शेतकऱ्यांना हमीभाव सुनिश्चित करणे आणि आंदोलन सुरू ठेवणे.
  7. शेतीला नोकरीचा दर्जा देणे; 10 एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार रुपये पगार देणे.
  8. पिक विम्यासाठी सरकारने तीन ट्रिगर उठवणे आणि पीकविमा देणे.

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर आपण सर्व शेतकऱ्यांना धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यांच्या सीमेवर बैठकीस बोलवू. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही.”

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांवरही भाष्य केले, पण मुख्य लक्ष शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेवर ठेवले. राज्यात अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात असल्याने या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील