शेतकऱ्यांनो, आधार नोंदणी करुन घ्या कारण…

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग व बँक अधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी युनिक आयडेंटिफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) चे मुंबई विभागाचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, भूसंपादन समन्वय अधिकारी तथा पुणे जिल्ह्याचे समन्वय अधिकारी (आधार नोंदणी) सारंग कोडलकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ”महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची आधार नोंदणी आवश्यक आहे. आधार नोंदणी अभावी कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्ज खात्याला संलग्न असणे गरजेचे आहे. यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची सोय विचारात घेऊन त्यांच्या आधार नोंदणीसाठी मंडळ स्तरावर ‘आधार नोंदणी शिबिरे’ आयोजित करावीत, जेणेकरून मंडल स्तरावर हे काम गतीने पूर्ण होईल.

सुमनेश जोशी यांनी आधार नोंदणी प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी युआयडीएआयच्या पोर्टल संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करुन सविस्तर माहिती दिली. बैठकीला संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा