शेवगाव, दि.३ जून २०२० : शेवगाव तालुक्यात एका माथेफिरू ट्रक चालकाने बेजबाबदारपणाने गाडी चालवत रस्त्यावर येणाऱ्या – जाणाऱ्या गाड्या, व्यक्तींना हुलकावणी देत जखमी करत रस्त्याच्या कडेला असलेल्या मोबाईल दुकानाला जाऊन धडकवला. यावेळी या परिसरात बघ्यांची बीच गर्दी झाली होती.
ट्रक चालक नामे खोसे हा बीड जिल्ह्यातला असून तो कोपरगाववरून नांदेडकडे जात होता. श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभानमध्ये याने धडक देवून भरधाव वेगाने ट्रक नेवासा फाटा, भेंडा, कुकाणा मार्गे शेवगावकडे निघाला होता. रस्त्यात लोकांनी टाकलेले लाकडे, बॅरिकेट तोडून त्याचे मार्गक्रमण चालूच होते. नेवासा पोलिसांचे एक पथक व काही नागरिक त्याचा पाठलाग करत होते.
नेवासा फाट्याहून माथेफिरु ट्रक चालक भरधाव वेगाने येत होता. रस्त्यावर असलेल्या कुकाणा पोलिसांनी नाकेबंदी केली होती. तेथील लावलेली बॅरीकेटिंग तोडून तो पुढे निघाला.
शेवटी पुढे शेवगाव पोलिसांना ही माहिती कळविण्यात आल्यावर त्यांना मिळालेल्या अवघ्या दहा-पंधरा मिनिटांच्या वेळेत क्रांती चौकात दगडांचा अडथळा निर्माण केल्याने सदर ट्रक थांबण्यास मदत झाली.
मात्र, हा ट्रक चौकातील एका मोबाईल शॉपीवर जाऊन आदळला. त्यात चालकांच्या डोक्यास जबर मार लागल्याने पोलिसांनी त्याला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले .या ट्रकमध्ये दारू असल्याची माहिती मिळते. हा ट्रक बारा चाकाचा असून चालक इतका बेफाम गाडी चालवत होता की चालकांच्या बाजूचे दोन चाके (टायर) निखळून पडले तरी तो वेगाने ट्रक चालवत होता. शेवगाव येथील बस स्थानक चौकात मंगळवारी (दि. २) रात्री १० च्या सुमारास पोलिस व नागरिकांच्या मदतीने या ट्रक चालकाला थांबवण्यात यश आले.
न्युज अनकट प्रतिनिधी: