मुंबई, ११ जुलै २०२३ : राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा आठ दिवसांपूर्वी शपथविधी झाला. परंतु अजूनही त्यांना खाते वाटप करण्यात आले नाही. काल रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. खाते वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तब्बल ३ तास ही बैठक सुरु होती. अजित पवार आपल्या निवासस्थानी निघून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावरच होते. शिंदे-फडणवीसांमध्ये चर्चा सुरु होती. शिंदे आणि फडणवीसांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. निदान आता तरी खातेवाटपाचा तिढा सुटला असेल, अशी अपेक्षा आहे. कारण मंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार बिनखात्याचे मंत्री आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का दिला. ते एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी झाल्याने सरकार अजून मजबुत झाले आहे. पण आता तिसऱ्या भिडूला सत्तेतला वाटा द्यावा लागणार आहे, त्यामुळे भाजपा-शिवसेना दोघांना काही तडजोडी कराव्या लागतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना अजून खातेवाटप जाहीर झालेले नाही. खाते वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खात द्यायला विरोध आहे. कारण निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा या आमदारांचा आरोप आहे. त्याच मुद्यावरुन बंड करुन त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आता अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खाते नको, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु अर्थ मंत्रालय अजित पवार यांच्याकडे गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर