पुणे, ४ नोव्हेंबर २०२२ : राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल् सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, अशा राजकीय वर्तुळात चर्चा चालूच आहेत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार राष्ट्रवादीच्या आधिवेशना नंतर पडणार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये आजपासून दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात या शिबिरात विचारमंथन होणार आहे. शिबीर सुरू होण्याआधीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेना फुटली. हा आमच्या गावचा पायगुण आहे. आता राष्ट्रवादीचं अधिवेशन झाल्यावर राष्ट्रवादी फुटेल, असा दावा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला होता. हेच विधानं पकडत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिर्डीला आम्ही सांगणार आहे की तिथे एक अधिवेशन झालं, सरकार पडलं. हे मान्य आहे. पण आता हे अधिवेशन झाल्यावर सरकारच पडणार. शिर्डीत एक अधिवेशन पार पडलं. अन् महाविकास आघाडी सरकार पडलं आताही आमचं अधिवेशन झाल्यावरच सरकार पडेल काँग्रेसचं अधिवेशन झालं. देवाला काय माहीत कुणाचं सरकार आहे. त्याने सरकार पाडलं. आता आमचं अधिवेशन झालं तर राज्यातील सरकार पडेल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी दुजोरा दिला आहे. सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात.
पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात ही पूजा नसेल. आत्ता आगामी काळात महाविकस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसतील असं अमोल मिटकरी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे