मुंबई, १२ जानेवारी २०२३ : सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. बुधवारी (ता. ११ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सुमारे ४० हजार पदांवर नियुक्ती आदेश दिले. सोबतच या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. राज्यातील सर्व महापालिका आणि ‘अ’ दर्जाच्या नगरपालिकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली. या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशिवाय शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या घोषणेची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि पंचायतींमध्ये ५५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. यापैकी राज्यस्तरीय आणि संबंधित नागरी संस्थांमध्ये ४० हजार विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य श्रेणीतील एकूण १९८३ पदे आणि नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावर ‘गट-अ’ आणि ‘गट-ड’मधील ३७२० पदांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया ३४ जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकार्यांच्या देखरेखीखाली भरती समितीमार्फत केली जाणार आहे.
याशिवाय मुंबई महापालिकेतील ८४९० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ते मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महापालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर सर्व सेवांसंबंधीची भरतीप्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयांमुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना अनेक संधी मिळणार आहेत. या मोठ्या घोषणेबाबत युवावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड