दुबई २१ फेब्रुवारी २०२४ : ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ या संकल्पनेतून जगभरातील ७५ देशात मोठ्या उत्साहात ‘शिवजयंती’ साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच आणि सत्यशोधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंती सलग १० व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुबई येथील ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि प्रबोधनकार गंगाधर बनबरे हे उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. विक्रम भोसले आणि मुकुंदराज पाटील यांनी दिलेली शिवगर्जना ऐकून उपस्थित सर्व जण भारावून गेले.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवचरित्रातून प्रबोधन – काल, आज, उद्या या विषयी बोलताना सांगितले की राजमुद्रेत लिहिल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहेत. आजच्या युगात शिवराय आले असते तर ते तलवार किंवा घोडा घेऊन येणार नाहीत, ते शिक्षणसत्ता,अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रसार-माध्यमसत्ता हाती घेऊन संविधानाच्या चौकटीत राहून लोककल्याणाकरिता वापरतील. सर्व जाती धर्मातील लोकांना, युवकांना, महिलांना सोबत घेऊन आजच्या शतकात लागणाऱ्या अत्याधुनिक उपाययोजना उपलब्ध करून देतील. इतिहासातील लढाई ढाल आणि तलवारीच्या जीवावर करण्याची होती पण आजची लढाई ही ज्ञानाची, शिक्षणाची आणि लेखणीची आहे. त्यामुळे जबाबदारी घ्यायची तर पूर्णपणे घ्यायची तयारी असावी. कावेबाज धर्मांध लोकांच्या मागे जाऊन दगड आणि तलवारी उचलु नका. आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे पराक्रमी, विद्वान्, लेखक, वाचक आणि बहुभाषिक व्हावे आणि शिव-शंभू चरित्रातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले.
प्रबोधनकार बनबरे यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी रायगड येथे जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून, पहिली शिवजयंती सुरू केली. सूर्य, चंद्र जातील पण शिवराय आणि शिवरायांचे विचार कायम राहतील. तसेच सत्यशोधक आणि आपण याविषयी दुबईकरांचे प्रबोधन केले. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी शिव-शाहू विचार काळाची गरज या विषयी बोलताना सांगितले की मराठे शिवरायांचा विचार विसरले त्यामुळे इंग्रजांचे राज्य भारतावरती आले. राजर्षी शाहू महाराज इतिहासकारांना सोबत घेऊन शिवचरित्र लिहित असताना किती त्रास झाला, अडचणी आल्या ते सांगितले. तसेच “वाघनखे” त्या संदर्भातील समज-गैरसमज आणि सद्यस्थिती मधील शिवरायांचे नाव घेऊन तरुणांचे दिशाभूल करणारे कावेबाज राजकारण याच्यावरती प्रकाश झोत टाकला.
यानिमित्त चित्रकला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आशिष जीवने यांनी सत्यशोधक आणि त्यांची कार्य याविषयी माहिती दिली. आतापर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच व सत्यशोधक दुबई’ यांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला. यानंतर सुनंदा सपकाळे आणि विक्रम भोसले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रम स्थळी विविध प्रबोधनकारी सामाजिक संदेश देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. तसेच दुबई येथे वाचन संस्कृती तयार व्हावी यासाठी “शिवग्रंथ पेटी आपल्या दारी” हा विशेष उपक्रम दुबई येथे राबवण्यात येतो, त्यातील काही पुस्तके येथे शिवप्रेमींसाठी उपलब्ध होती. ज्ञानवर्धक शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिलांना “जिजाऊंची शिकवण” हे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंह शिंदे आणि पंकज आवटे यांनी केले. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने यांनी व्यवस्थित पार पाडली. तसेच एस जे लाईव्ह च्या माध्यमातून सागर जाधव यांनीसुद्धा हा कार्यक्रम हजारो शिवप्रेमी पर्यंत पोहचवला. शेवटी अभिजीत देशमुख यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवने, राजेश पाटील, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, मुकुंदराज पाटील, निखिल गणूचे, दीपक जोगदंड, जितू सपकाळे, जयंत रंगारी, रामेश्वर कोहकड़े, अमोल कोचळे व पंकज आवटे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतले. दुबई येथे सलग १० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी, संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश जाधव