भिमानगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

माढा, २१ फेब्रुवारी २०२४ : भिमानगर ता. माढा येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी पुरोगामी विचार मंचचे आदित्य जाधव यांनी प्रास्ताविक करताना आजच्या घडीला शिवरायांचा खरा इतिहास पुढे येणे गरजेचे असून त्यासंदर्भात अधिक व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे बोलून दाखवले.

इतिहासाचा अभ्यास करताना फक्त सनावळ्या आणि इतिहासपुरुषांची नावं लक्षात ठेवून उपयोग नाही तर त्या घटनांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. अगदी शिवाजी महाराजांचीसुद्धा त्या काळामध्ये शत्रू विरोधात लढताना काय मानसिकता होती? त्यांनी शत्रूच्या पराभवासाठी कोणत्या युक्त्यांचा वापर केला? आणि राज्यकारभार करत असताना सर्वसामान्य रयतेपासून ते शेतकरी, महिला, व्यापारी, लष्करातील लोक यांच्याविषयी काय धेय्यधोरणं होती याचा विचार होणं आज गरजेचं आहे. याचबरोबर मोगलांप्रमाणे आपल्याकडे इतिहासाचे सुसंगत लिखाण झाले नाही. समकालीन अस्सल इतिहासाची साधने ही फार कमी प्रमाणात असून बराचसा शिवकालीन इतिहास हा परकीय साधनांवरून घेतला गेलेला आहे. त्यामुळेच ह्या गोष्टीचा फायदा उठवत काही विशिष्ट लोकांकडून शिवकालीन इतिहासाचा वापर हा जातिवादासाठी, धर्माधर्मामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी केला जात आहे. परंतु वा. सी. बेंद्रे, नरहर कुरुंदकर, जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, श्रीमंत कोकाटे या सत्यवादी इतिहासकारांनी संशोधन करून वस्तुस्थितीवर आधारित खरा इतिहास लिहिला तो आपण वाचला पाहिजे. मध्ययुगीन काळात ज्ञानोबा तुकोबांनी दिलेला सामाजिक समतेचा विचार शिवरायांनी स्वीकारलेला होता आणि ज्यावेळी आपण समतावादी समाज व्यवस्थेच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू त्यावेळी तीच छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे मत देखील आदित्य जाधव यांनी नोंदवले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील यांनी मनोगतामध्ये शिवरायांच्या शेतकरी विषयक धोरणांची माहिती सांगितली. मोहिमेवरती असताना शिवरायांनी आपल्या सैनिकांना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नये अशा प्रकारचा नियम घालून दिलेला होता. आजचे सरकार हे फक्त मतांच्या राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर करत असून शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याचे मत प्रशांत पाटील यांनी बोलून दाखवले.

या प्रसंगी वि. शिं. स. सा. का. चे संचालक ज्येष्ठ नेते वेताळ अण्णा जाधव,माजी सरपंच प्रशांत पाटील, सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील, बाळासाहेब जाधव, रमेशनाना पाटील, देशमुख रावसाहेब, हनुमंत झराड, रत्नकांत कोळपे, दत्तात्रेय काळे, विवेक जाधव, विठ्ठल माने, बाळासाहेब पाटील, राहुल इंगळे, तानाजी गायकवाड, अमित वाघ, अक्षय पाटील, सौरभ आर्किले, गणेश शिंदे, मेघराज पाटील, धवल पाटील, सुशांत शिंपी, राज माने, मुन्ना सरडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा