शिवपुराण कथा, इज्तेमातून पालटला मालेगावचा नूर
मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव म्हटले, की अतिसंवेदशील शहर अशी चर्चा राज्य व देशभर होत असते. येथील सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. येथील चांगल्या गोष्टींचा प्रचार, प्रसार फारसा झाला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
चालू वर्षात झालेल्या दोन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अतिसंवेदनशील असलेल्या मालेगावकरांकडून मात्र सामाजिकतेचा संदेश संपूर्ण देशात गेला आहे. यासाठी कारण ठरले आहे ते दोनदिवसीय इज्तेमा आणि पंडित श्री. प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा. पुण्य श्री शिवमहापुराण कथेच्या गर्दी आणि इज्तेमाने मालेगावला टोमणे मारणाऱ्यांना सणसणीत चपराक मारली आहे.
श्री शिव महापुराण कथेच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर राज्यासह देशभरात मालेगावचे नाव चर्चेत आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील; तसेच अन्य राज्यातील लाखो भाविकांनी मालेगावला हजेरी लावत ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. कथेच्या सात दिवस जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक मालेगावी मुक्कामी होते. यात महिला भाविकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. देवाधिदेव महादेवांच्या कथा श्रवणासाठी आलेल्या लाखो भाविकांना सर्वधर्मीय मालेगावकरांनी दिलेली सेवा अभूतपूर्व होती. मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या शिवभक्तांनी मालेगावची प्रतिमा बदलली आहे.
शिव महापुराणसाठी येथे पाच लाखांहून अधिक भाविकांनी कथेला हजेरी लावली. अखेरच्या दोन दिवसांत मैदान हाऊसफुल्ल झाल्याने कॉलेज रोड, कॅम्प रोडवर भाविकांनी ताबा घेतला होता. आजवरचे सर्व विक्रम या दोन दिवसांतील गर्दीने मोडून काढले.
मालेगावने दोन दशकापासून शांततेची कूस घेतली आहे. २००१ पासून सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करीत आनंदात राहत आहेत. दंगल, बॉंस्फोट, कोरोना अशा विविध कारणांनी मालेगावला बदनाम केले जाते; परंतु मालेगावात पंधरा दिवसांत झालेला हिंदू व मुस्लिम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण देशाला सामाजिकतेचा संदेश दिला आहे. मुस्लिम बांधवांचा येथील सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतीत इज्तेमा झाला. दोन दिवसांच्या इज्तेमा कार्यक्रमास लाखोंची उपस्थिती होती. त्यापाठोपाठ हिंदू बांधवांच्या शिवमहापुराण कथा लाखो श्रद्धाळूंच्या उपस्थितीत निर्विघ्नपणे पार पडली.
शिवमहापुराण कथा स्थळावर रात्रीचे दृश्य पाहण्यासारखे होते. हजारो महिला व पुरुष भाविक महादेवाचे भजन नाचत-गात आनंद साजरा करीत होते. विशेष म्हणजे यात तरुणाईचा समावेश लक्षणीय होता. महादेवाच्या या भाविकांना सुरक्षिततेची कुठलीही भीती वाटली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंतचा गजर व मालेगावकरांनी पाहुण्या भाविकांची केलेली सेवा अद्वितीय होती. दानशूर व सेवेकऱ्यांच्या हजारो हातांनी लाखो भाविकांची मनोभावी सेवा केली. ‘कसमादे’सह इतर जिल्ह्यांतूनही अनेक दानशूरांनी सेवेत हातभार लावला. अतिसंवेदनशील असलेल्या मालेगावची नवी ओळख निर्माण करण्यास सर्व घटकांसह मालेगावकरांच्या अथक मेहनतीचा मोठा वाटा आहे. “महादेवांच्या आशीर्वादाने मालेगावकरांनी भाविकांच्या सेवेसाठी अपार कष्ट घेतले. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ज्ञात, अज्ञात हजारो जणांनी यात खारीचा वाटा उचलला आहे. रोज पाच लाखांवर भाविक येणे. हजारो भाविक सात दिवस मुक्कामी राहणे. कोणतेही गालबोट न लागता सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. श्री महादेवाच्या आशीर्वादाने हे सर्व घडले.”
- दादा भुसे, पालकमंत्री नाशिक
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील