शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश, फडणवीस म्हणतात, तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला

पुणे, २० ऑगस्ट २०२१: शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने भाजपला ही संधी आहे. जसा तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता. आता तीन पक्ष एकत्र आलेत आता श्वास त्यांचा कोंडतोय’.

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ‘युती असल्याने तेव्हा पक्ष वाढीसाठी काही मर्यादा होत्या. पण आता मोकळा श्वास घेतोय. २०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

‘विधानसभेच्या तीन निवडणुका आशाताई लढल्या. पण दुर्दैवाने तीनही वेळी घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. आता आम्हाला १०० टक्के विश्वास आहे २०२४ साली जुन्नरचा आमदार भाजपचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील. गेले अनेक दिवस आम्ही या प्रवेशाची प्रतिक्षा करत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतानाही आपल्या मूळ गावी गेल्या. तिथे ४ वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या.’ असं ही फडणवीस म्हणाले.

आशाताई बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला – बाहेरचा, जुना – नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो, असं फडणवीसांनी म्हटलंय. तर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा