सिंधुदुर्ग,२६ मे २०२३ : देशात होऊ घातलेली आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्ष कामाला लागले आहेत.महाराष्ट्रात सर्वच पक्षात अनेकजण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपल्याला पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवणार आणि विनायक राऊत यांना पराभूत करणार असे विधान केले आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका मांडताना दिसत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून दावे प्रति दावे केले जात आहेत. यावरून वाक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. त्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर वक्तव्य केलं आहे. पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाची चव चाखणार, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत केले आहे.
महाभारतात श्रीकृष्णाने सागितले होते युद्धात जरी आपला भाऊ समोर असला तरी त्याच्याशी युद्ध करायचे आणि त्याचा पराभव करायचाच, त्यानुसार जर पक्षाने मला आदेश दिले तर निश्चित राऊत यांचा पराभव करणार असेही केसरकर यावेळी म्हणाले. यावर विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर नेमके कोणत्या पक्षातून लोकसभा लढवणार आहेत, असा खोचक सवाल विनायक राऊत यांनी विचारला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर