वरुड, अमरावती १३ नोव्हेंबर २०२३ : यंदा पाऊस कमी झाल्याने अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचे संत्रा, मोसंबी, कापूस तसेच तूर आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी खरीप पिक तसेच फळ पिकांचा विमा काढला होता. झालेल्या नुकसानी बाबत सरकार आणि रिलायंस कंपनीकडून विमा भरपाई देण्याचे फक्त आश्वासनच मिळत असल्याने शेतकर्यांची दिवाळी अंधारात जात आहे. अखेर संतप्त ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड मधील रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
शासन, इन्शुरन्स कंपनी आणि शेतकऱ्यांच्या मागील बैठकीतच शिवसेना ठाकरे गटाने त्वरित पीक विम्याची मागणी केली होती, अन्यथा इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा देण्यात आला होता. दिवाळी आली तरी विम्याचे पैसे न मिळाल्याने शिवसेनेचे उमेश शहाणे आणि शिवसैनिकांनी इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडले.
शेतकऱ्यांचा संत्रा, मोसंबी तसेच कापूस, तूर व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असताना सरकार आणि रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीने वेळोवेळी बैठका घेतल्या, आश्वासने दिली. परंतु दिवाळी सण असताना सुद्धा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. एकतर सर्व शेतकर्यांना न्याय द्या अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जा असा सज्जड दम कृषी अधिक्षक कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी दिला होता.
सप्टेंबर २९ पासून पाठपुरावा करून व वारंवार बैठका घेऊनही सरकार व रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनी शेतकर्यांच्या मुळावर उठल्यानेच शिवसेनेचे उमेश शहाणे यांच्यासह शिवसैनिकांनी स्थानिक रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा आधीच दिला होता. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भगवे झेंडे घेऊन, घोषणा देत त्यांनी रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडले.
न्यूज अनकट प्रतिनीधी : मनिष जगताप