सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, ११ जानेवारी २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सिल्लोड तहसील समोर तीव्र असे निदर्शन करण्यात आले. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर लोकशाहीची हत्या करून ‘असत्याला न्याय, आणि सत्याला पायदळी तुडवण्याचे काम’ दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी केले. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे म्हणणे आहे.
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा विषय सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे चालू होता. या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना या आमदार अपात्र प्रकरणात निकाल देण्याचे निर्देश दिले होते आणि ते निर्देश संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात यावे असे संबोधले होते. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक आमदार अपात्र प्रकरणात एकाही आमदाराला अपात्र न करता सर्वांना पात्र करून शिवसेना हा पक्ष गद्दार एकनाथ शिंदेचा असल्याचे नमूद केले. वास्तविक पाहता पक्ष कुणाचा आहे?, कोणी निर्माण केला?, त्याची घटना काय सांगते?, त्याची घटना कोणी तयार केली? हे संपूर्ण देशाला, विधानसभा अध्यक्षाला आणि निवडणूक आयोगालाही माहीत असताना सुद्धा केवळ मोदी सरकारचे ऐकून त्यांनी हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने देऊन एक प्रकारे लोकशाहीची प्रतारणा करून हत्या केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा व त्याच्या कृतीचा आम्ही पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करतो असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, दशरथ सुरडकर, शहरप्रमुख मच्छिद्र धाडगे, उपतालुकाप्रमुख सुभाष वडगांवकर, गजानन जैसवाल, कैलास चव्हाण, महेन्द्र बावस्कर, विठ्ठल खिल्लारे, शिवा गौर, रामेश्वर काळे, नारायण आहेर, भास्कर आहेर, युवासेना उपजिल्हाधिकार अमोल पाटील, युवासेना तालुका अधिकारी अमोल शिंदे, भगवान शिमरे, सोमिनाथ बडक, रामेश्वर जंजाळ, अनिकेत ताठे, राहुल वाघ, पंकज कांबळे, रवि रासने, सचिन पाटील, संतोष भिवसने, रामेश्वर सन्नासे, सखाराम हिवाळे, सखाराम दुधे, विठ्ठल ठाले, सोमिनाथ सुरडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .
न्यूज अनकट प्रतिनिधी – डॉ सचिन साबळे