शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?

मुंबई, २२ सप्टेंबर २०२२ : गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्याची चर्चा एकीकडे थेट उच्च न्यायालयपर्यंत पोहचली असताना मुंबई महानगरपालिकेने यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कोणाचा असणार आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने पाहता शिवाजी पार्कवर कोणत्याच गटाला मेळावा घेण्यासाठी वातावरण अनुकूल नसल्याचा अभिप्राय मुंबई पोलिसांनी दिल्याचे समजते. म्हणूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने परवानगी नाकारल्याचे म्हटले जाते.

दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेने परवानगी नाकारली म्हणून शिवसेनेने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली. पण शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही शिवसेनेच्या याचिकेवर विरोध करत शिवसेनेच्या याचिकेविरुद्ध न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवार म्हणजे उद्यापर्यंत पुढे ढकलले आहे.

दरम्यान काल जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी, यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याची घोषणा देखील केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा