पुणे : पुण्यात शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी ७८ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवाजीराव भोसलेंसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मे दरम्यान घडली असून याप्रकरणी योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार भोसले यांच्याबरोबरच अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक आहेत. देशाची सर्वोच्च बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच्या २०१८-१९ च्या शिल्लक रकमेचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. बँक लेखा जोखा अहवालात भोसले यांच्यासह ११ जणांनी फायद्यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून खऱ्या असल्याचे भासवून ७१ कोटी ७८ लाख लपवून ठेवल्याची बाब निष्पन्न झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.