दुबई, १९ फेब्रुवारी २०२५ : परदेशात राहणाऱ्या नव्या पिढीतील मराठी मुलामुलींना आपल्या राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची नव्याने ओळख व्हावी, यासाठी रक्षक प्रतिष्ठान, प्रथा युएई आणि त्रिविक्रम ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत “प्रथा शिवसृष्टी २०२५ – शिवजयंती उत्सव” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ‘शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन’ आणि ‘सेवेचे ठायी तत्पर’ हे एकपात्री सादरीकरण. शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ अशा ‘होन’ या नाण्याची अस्सल प्रतिकृती येथे ठेवण्यात आली होती. त्याचसोबत गडकिल्ले संवर्धन याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदेश देखील नागरिकांपर्यंत पोचवला. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांनी या उपक्रमाबाबत आयोजक प्रथा संस्थेचं भरभरून कौतुक केलं.
प्रदर्शन विभागात सर्वप्रथम ‘शिव विचार डेली’ यां इंस्टाग्राम पेज ने संकलित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घडामोडींमधून घेतलेले प्रेरणादायी संदेश ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातील श्री. रवींद्र पवार यांनी संकलित केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे’ देखील प्रदर्शनात ठेवली होती. त्यामधील एक एक संदेश वाचून प्रत्येकाच्या मनात आपल्या राजाच्या विचारांबद्दल, त्यांच्या दूरदृष्टीबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल आदर कैक पटीने वाढला. या सोहळ्यास भारतीय मराठी पाहुण्यांसोबत असंख्य महाराष्ट्रेतर राज्यातून देखील पाहुणे उपस्थित राहतात आणि त्यांना देखील आपापल्या मातीतील क्रांतीवीर योध्यांना मानवंदना देता यावी म्हणून ‘भारत के वीर’ हे अनोखे प्रदर्शन देखील आयोजित केले गेले होते. यावेळी १२ राज्यामधील एक एक वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील याठिकाणी कल्चरल फोटोबुथ करण्यात आले होते. जेथे लहान मोठ्यांनी स्वराज्य काळातील पोशाख परिधान करून छायाचित्रे काढली. सोबतच प्रथा किड्स प्ले एरिया जिथे लहान मुलांना मावळ्यांची चित्रे रंग भरण्यासाठी दिली गेली, स्वराज्य jigsaw puzzle सारखे गेम्स दिले गेले. Capture the Forts या अनोख्या खेळातून मुलांना किल्ले जिंकून घेण्याचा अनुभव दिला गेला आणि त्यांना काही कमी परिचित दुर्गांची ओळख देखील झाली.
स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या भारूड, गायन आणि नाटुकलीला उपस्थितांनी उत्तम दाद दिली.
संयुक्त अरब अमिरातीमधील मराठी जनांनी एक अभूतपूर्व सोहळा अनुभवत आपण खूप काही घेऊन जात आहोत अशी भावना व्यक्त केली. या सोहळ्याला दिवसभरात तब्बल २००० जणांनी उपस्थिती लावली. आपापले प्रपंच आणि नोकऱ्या सांभाळत, कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसताना स्वयंसेवकांनी साकारलेले किल्ले यापेक्षा शिवप्रेम वेगळे ते काय, असं मत पाहुण्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून श्री. सुनिलजी मांजरेकर, श्री. विवेक कोल्हटकर, श्री अशोक व सौ. प्राची सावंत, सौ. स्मेयता गिरीश उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे श्री. सुशिल मोझर यांनी खास पुण्याहून येत या सोहळ्यास आपली उपस्थिती लावली. या सोहळ्याची सांगता यूएई मधील मानाच्या पहिल्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या विशेष वादनाने झाली.
न्यूज अनकट दुबई प्रतिनिधी