गोल पोस्ट इतर राजकारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले ठाकरे गटाचे शिवबंधन

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले ठाकरे गटाचे शिवबंधन

छत्रपती संभाजीनगर, ३ मार्च २०२३ : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक आदींनी मोठ्या संख्येने हाती शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे शेकडो भाजप पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका बबिता चावरिया, भाजप माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माजी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर, भाजप मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजप माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मोहसीन खान, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे; तसेच भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

विरोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू, अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड आदी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

error: Content is protected !!
Exit mobile version