पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ४० शिवभोजन केंद्रांचे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून असलेले दोन कोटींहून अधिक रकमेचे अनुदान थकीत असल्याने केंद्रचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. वेळेवर निधी न मिळाल्याने गोरगरिबांना केवळ १० रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी पुरवणे केंद्रचालकांना अशक्य झाले असून, ही केंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
शिवभोजन योजनेच्या शासन निर्णयानुसार, केंद्रचालकांना प्रत्येक १५ दिवसांनी अनुदान मिळणे अपेक्षित असते. पिंपरी-चिंचवड आणि पुणे मिळून या ४० केंद्रांना दर पंधरवड्याला १९ ते २० लाख रुपये मिळायला हवेत. मात्र, एप्रिल महिन्यापासून निधीचे वाटप जवळजवळ ठप्प झाले आहे. दिवाळीपूर्वी मार्च आणि काही केंद्रांचे एप्रिलचे अनुदान आले असले तरी, मे महिन्यापासूनचा कोट्यवधींचा निधी अद्यापही थकीत आहे.
“गेल्या सात महिन्यांपासून तोटा सहन करत थाळ्या पुरवत आहोत. आता पुढे केंद्र चालवणे अशक्य झाले आहे. अनुदान न मिळाल्यास केंद्र बंद करावे लागेल,” अशी खंत पीएमआरडीएतील एका केंद्रचालकाने व्यक्त केली. विपुल मित्तल या केंद्रचालकांनीही वेळेवर निधी देण्याची मागणी केली आहे.
जर ही केंद्रे बंद पडली, तर रोज फक्त १० रुपयांत दोन पोळी, भाजी, भात आणि आमटी मिळवणाऱ्या हजारो गरजू नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन केंद्रचालकांचे थकीत अनुदान तात्काळ वितरित करावे, अन्यथा गरिबांसाठीची ही महत्त्वाची योजना संकटात सापडेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































