नारायणगाव, १८ ऑगस्ट २०२३ : पुणे-नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. नारायणगाव या ठिकाणी बाह्य-वळणावर खोडद चौकात, दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लेन तोडून विरुद्ध दिशेला जाऊन अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार सिद्धेश सोपान पाटे यास किरकोळ दुखापत झाली आहे, तर बसमधील काही प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघात आज सकाळी घडला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेली शिवशाही बस ही आज सकाळी नारायणगाव येथील बाह्यवळणावरील खोडद चौकात आली असता, नारायणगाव येथून खोडद दिशेला दुचाकी घेऊन निघालेला सिद्धेश हा देखील चौकात आला. त्याला वाढवण्याच्या प्रयत्नात शिवशाहीच्या चालकाने बस विरुद्ध दिशेला नेली. त्यामुळे शिवशाही बसला अपघात होऊन बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. तर सिद्धेशच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
हा अपघात झाल्यानंतर शिवशाही बसचा हायड्रॉलिक दरवाजा लाॅक झाल्याने मदतीला आलेल्या नागरिकांनी बसची पुढील काच फोडून प्रवाशांना पिकअप गाडीच्या साह्याने बाहेर काढले. घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार, हवालदार संतोष कोकणे, गंगाधर कोतकर व कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर