ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, आता सायबर हॅकर्सनी एका राजकीय नेत्यालाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पिंपरी-चिंचवड महानगरप्रमुख राजेश वाबळे यांची ४५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय मदतीचे कारण सांगून आणि ओळखीचा फायदा घेऊन ही फसवणूक करण्यात आली.
ही घटना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. वाबळे यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला शिवसेना सोशल मीडियामधील ‘गणेश शर्मा’ असल्याचे भासवले. शर्मा हे वाबळे यांच्या ओळखीचे असल्याने त्यांना त्या व्यक्तीवर लगेच विश्वास बसला. बोलताना त्याने, “माझ्या खात्यावर पैसे येत नाहीत आणि डॉक्टरला तातडीने पैसे पाठवायचे आहेत,” असे सांगितले. सुरुवातीला दोन रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज वाबळे यांना दाखवून त्यांचा विश्वास अधिक दृढ केला. त्यानंतर, आरोपीने ४५ लाख रुपयांचा एसएमएस दाखवून डॉ. कौर यांच्या दुसऱ्या क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले.
या फसवणुकीची माहिती मिळताच वाबळे यांनी तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय व्यक्तीही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ओळखीचा’ माणूस बनून फसवणूक करण्याची ही नवी युक्ती समोर आल्याने पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ही घटना सायबर सुरक्षेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे










































