पुणे, २८ ऑक्टोबर २०२२ : संशयाचे भूत माणसाच्या मानेवर बसले तर माणूस कोणत्या थराला जाईल याची शाश्वती नसते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशय ही गंभीर बाब असते. पती-पत्नी मधील कोणालाही एकमेकांवर संशय यायला लागला की हे नाते टोक गाठते. अनेकवेळा या संशयाचे भयंकर स्वरूप दिसते. पिंपरी चिंचवडमध्ये अशीच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरुन खाली टाकले.
पिंपरी चिंचवड मधील भोसरी एमआयडीसी परिसरात हा भयानक प्रकार घडला आहे. या घटनेत दहाव्या मजल्याहून खाली पडल्यानंतर निलेश जार्वेकर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती पंकज शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती पंकज शिंदे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने आपण गावाला जात आहे असे सांगून तो घरातून बाहेर पडला. याचदरम्यान त्याच्या पत्नीचा मित्र निलेश जोर्वेकर तिला भेटायला आला. पंकजची पत्नी आणि निलेश हे जवळचे मित्र होते. परंतु पंकज पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस आगोदर गावावरून परत आला. यावेळी पत्नीला निलेशसोबत पाहून त्याचा संताप अनावर झाला.
यावेळी पंकजने पत्नीसमोरच निलेशबरोबर भांडण सुरू केले. यादरम्यान रागातुन पंकजने धारदार चाकूने निलेशला भोकसले. यावेळी निलेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर पंकजने निलेशला आपल्या घराच्या दहाव्या मजल्यावरून खाली फेकले. यात निलेशचा मृत्यू झाला. आरोपी पती पंकजला पोलिसांनी अटक केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर