धक्कादायक; सांगलीत होतेय परप्रांतीय मुलींची तस्करी!

सांगली, ३ फेब्रुवारी २०२३ : सांगली शहर आणि परिसरात वेश्या व्यवसायासाठी नेपाळ, बांगलादेश, पश्चिम बंगाल व कर्नाटकमधील मुलींची तस्करी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या मुलींना छोटी-मोठी नोकरी किंवा घरकामासाठी म्हणून तेथून आणले जाते. प्रत्यक्षात या मुलींचा वेश्या व्यवसायासाठी सौदा केला जात आहे. स्थानिक दलाल व एजंटांची मोठी साखळीच यामध्ये सक्रिय आहे. या सगळ्या प्रकारात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही स्पष्ट होत आहे.

सांगलीत गोकुळनगर व प्रेमनगर येथे पूर्वी कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मुलींना वेश्या व्यवसायासाठी विकले जात होते. मुलगी वयात आली की सांगली, मिरजेतील दलाल महिला व एजंटांशी संपर्क करून त्यांचा सौदा केला जात होता; मात्र गेल्या पाच-दहा वर्षांत कर्नाटकातील ही परंपरा आता बंद झाली आहे. तेथील मुली येथे वेश्या व्यवसायासाठी आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

नेपाळ, बांगलादेश व पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. या परिस्थितीचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील दलाल व एजंट आजपर्यंत घेत आले आहेत. नेपाळ, बांगलादेश व पश्चिम बंगालमधील एजंटांशी लागेबांधे ठेवून तेथील मुलींचा एकप्रकारे सौदाच करण्यात येत आहे. मुलींना घरकामासाठी नेतो, असे आई-वडिलांना सांगितले जाते. मुलींचा पासपोर्ट काढला जातो. त्यानंतर त्यांना भारतात आणले जाते. तेथून मग त्यांना कोणत्या जिल्ह्यात न्यायचे, हे ठरविले जाते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा