आयपीएलसाठी धक्कादायक बातमी… ‘या’ संघातील १३ जणांना कोरोनाची लागण

यूएई, २८ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या काळात आयपीएल होणार की नाही अशी चर्चा दोन महिन्यांपूर्वी सुरू होती. मात्र, देशातील कोरोनाची स्थिती पाहता अखेर आयपीएलचे सामने यूएई मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. असं असलं तरी आता पुन्हा आयपीएल वर कोरोनाचं सावट फिरताना दिसत आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, यूएईला आयपीएलचे सामने खेळण्यासाठी गेलेला चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका गोलंदाजासह संघातील १२ सहकर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी बीसीसीआयने यूएई मध्ये दाखल होताच काही नियम घालून दिले होते. या नियमांचं पालन देखील या संघातील सदस्यांनी केलं होतं. सहा दिवस विलगीकरण कक्षात राहून देखील त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सदस्यांची नावे बीसीसीआयनं घोषित केलेले नाही.

संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यांसारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा