औरंगाबाद, २१ जुलै २०२२: औरंगाबादच्या वैजापूर तालूक्यातील बायगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून दोन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बायगाव परिसरात सुसाट सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे विजेची तार बैलगाडीवर पडून दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे.
साहेबराव गणपत चेळेकर (वय ७०), लहान बंधू बाबूराव गणपत चेळेकर (वय ५७ ) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चेळेकर बंधू एकत्र कुटूंबात राहतात. दरम्यान पाऊस बंद झाल्याने शेतातील कामासाठी दोन्ही भाऊ शेतात गेले होते.
त्यानंतर संध्याकाळी शेतातील काम अटोपून साहेबराव चेळेकर लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे निघाले. त्याच वेळी शेजारील शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव यांच्या बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरला आणि बैलासह साहेबराव यांचा जागीच मृत्यु झाला.
साहेबराव यांच्या बैलगाडीत वीजप्रवाह उतरल्यानी घटनास्थळी मोठा आवाज झाला. त्यामुळे बाबूराव चेळेकर यांनी धाव घेत आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र याचवेळी यांचा सुद्धा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीज प्रवाह बंद करुन दोन्ही भावांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णाल्यात नेले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान एकाचवेळी ऐकाच घरातील दोन महत्वाच्या व्यक्तींवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर घटनास्थळी शिऊर पोलीसांनी पाहणी करत तपास सूरु केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर