बारामती, दि.१२ मे २०२० : ५१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बारामतीत रोटेशन पध्दतीने दुकाने सुरु करण्यात आली आहेत. रविवारी व्यापारी महासंघ आणि प्रशासनाच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पुणे शहराच्या धर्तीवर दुकाने सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे बारामतीकरांनी अनेक दिवसानंतर मोकळा श्वास घेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी घेताना दुकानदारांसह नागरीकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. तरच प्रशासनाने दिलेल्या संधीचे सोने करणे शक्य होणार आहे.
बारामती दि.१२ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची मुदत समाप्त झाली. त्यामुळे आजपासुन दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली. बारामती शहरातील दुकाने रोटेशन पध्दतीने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी अॅटोमोबाईल्स, कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, स्वीट होम, खेळणी दुकाने, फुले व पुष्पहार दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. यावेळी प्रशासनाने दुकानदारांना दुकानात ग्राहकांना प्रवेश देताना नियमावली आखून दिली आहे.
त्यानुसार ग्राहकांनी मास्क तोंडावरती बांधलेला असेल तरच त्यांना
खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानामध्ये एकावेळी फक्त ५ ते १० ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे,दुकानाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी,दुकानात प्रवेशाच्या वेळी सर्व ग्राहकांना हॅण्डवॉश किंवा हॅण्ड सॅनिटायजरची सुविधा करण्यात यावी, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. शक्यतो वय वर्षे ५ पर्यंत व ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश देण्याचे टाळावे,कामगारांच्या एकुण क्षमतेच्या ३३% कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क व फेस शिल्ड वापरणे बंधनकारक राहील, सर्व आस्थापना यांनी त्यांचे दुकानात एक रजिस्टर ठेवावयाचे असून त्यामध्ये येणाऱ्या ग्राहकांची संपुर्ण माहिती संपुर्ण नांव, संपुर्ण पत्ता, वेळ व मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे,दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर (दो गज की दुरी) ठेवण्यात यावे,अत्यावश्यक सेवा व शेती विषयक बाबी दररोज सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या आस्थापना तात्काळ बंद करण्यात येऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दुकाने रोटेशन पध्दतीने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे. यावेळी लॉकडाऊन संपल्याचा बारामतीकरांचा समज झाल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. दुकाने सुरु झाली तरी,कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.त्यामुळे बारामती कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरीक ,दुकानदारांची मोठी जबाबदारी आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव